Thailand-Cambodia : चीनच्या मध्यस्थीनंतर थायलंड-कंबोडिया युद्धबंदीवर शिक्कामोर्तब !

Thailand-Cambodia – थायलंड आणि कंबोडियाने आपल्यातील युद्धबंदी कराराची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे. चीनने या दोन्ही देशांमधील सीमाभागातील तणाव संपवण्याच्या उद्देशाने मध्यस्थी केली. त्यानंतर या दोन्ही देशांनी युद्धबंदी कराराचे पालन करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.
मलेशियामध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. या युद्धबंदीची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून होणे अपेक्षित होते. मात्र लवकरच या युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या घटनाही घडल्या. कंबोडियाकडून काही ठिकाणी हल्ले केल्याचा आरोप थायलंडच्या सैन्यदलाने मंगळवारी सकाळी केला होता.
मात्र कोणत्याही ठिकाणी गोळीबार झाला नसल्याचे कंबोडियाने म्हटले आहे. कंबोडियाने केलेल्या कथित गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून थायलंडच्या सैन्यानेही बुधवारी सकाळी सीमेवर गोळीबार केला. मात्र या गोळीबाराच्यावेळी अवजढ शस्त्रांचा वापर करण्यात आला नाही, असे सांगितले.
कंबोडियाच्या सैन्याच्या या कृतीमुळे युद्धबंदीचे उघड उल्लंघन केले आहे. कंबोडियाच्या सैन्यामध्ये सद्भावनेचा अभाव असल्याचे दिसून येते आहे, हेच यातून दिसून येते, असे थायलंडचे परराष्ट्र मंत्रालयाने आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मात्र बुधवारी दुपारी ;नचे उपमंत्री सून वेइदोंग यांनी शांघायमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेतली. त्यानंतर थायलंड आणि कंबोडियाच्या प्रतिनिधींनी युद्धबंदीचे पालन करण्याची कटिबद्धता व्यक्त केली. बैठक संपवल्यानंतर दोन्ही नेते स्मितहास्य करत बैठक कक्षाबाहेर येताना दिसले होते.
तणाव कमी करण्यासाठी चीनच्या सकारात्मक भूमिकेबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ही एक अनोपचारिक बैठक होती. दोन देशांमधील सीमावाद सोडवण्यासाठी चीन विधायक भूमिका बजावत असल्याचेही चीनच्या निवेदनात म्हटले आहे.





