India-Japan partnership : “भारत-जपान संबंधांतून तिसऱ्याला लक्ष्य केले जाऊ नये..”; जपानच्या पंतप्रधानांच्या भारतभेटीवर चीनची खोचक प्रतिक्रिया
भारत आणि जपान दरम्यानच्या सहकार्याद्वारे कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य केले जाऊ नये किंवा अन्य देशाच्या हितांना बाधा पोचवली जाऊ नये, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.

India-Japan partnership : भारत आणि जपान दरम्यानच्या सहकार्याद्वारे कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य केले जाऊ नये किंवा अन्य देशाच्या हितांना बाधा पोचवली जाऊ नये, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.
जपानच्या पंतप्रधान सानाइ ताकाइची यांच्या भारतभेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या घेण्यात आलेल्या विविध निर्णयांच्या पार्श्वभुमीवर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे.
देशांमधील सहकार्य हे प्रादेशिक देशांमधील सामंजस्य आणि विश्वास वाढवण्यासाठी तसेच प्रदेशातील शांतता व स्थैर्य जपण्यासाठी पोषक असले पाहिजे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून म्हणाले.
ताकाइची आणि पंतप्रधान मोदी यांच्यातल्या चर्चेमध्ये भारत आणि जपानमधील दुर्मिळ खनिजांच्या उत्खननाविषयी तसेच पुरवठा साखळी बळकट करण्याविषयीच्या सहकार्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.
या सहकार्याद्वारे कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य केले जाऊ नये. विशेष लहान गटांना एकत्र आणण्यासाठी, फूट व संघर्ष भडकवण्यासाठी या सहकार्याच्या संबंधांचा वापर तर मुळीच होऊ नये.
जागतिक औद्योगिक आणि पुरवठा साखळ्या सुरक्षित व स्थिर ठेवणे ही सर्व देशांची समान जबाबदारी आहे. सर्वांनी या प्रक्रियेमध्ये विधायक भूमिका स्वीकरून खुलेपणाचा आणि सहकार्याचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले.
गुरुवारी पंतप्रधान मोदी आणि ताकाइची यांच्यातल्या चर्चेनंतर भारत आणि जपानमध्ये आर्थिक भागीदारीचा आराखडा निश्चित करण्यात आला.
याशिवाय लष्करी उपकरणांच्या हार्डवेअरची सहनिर्मिती आणि तेलाच्या टंचाईचा सामना करण्यासाठी ऊर्जाविषयक संबंधांबाबतचा करारही केला गेला आहे.
ताकाइची जपानच्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी तैवानबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जपान आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ताकाइची यांच्या भारतभेटीकडे चीनचे बारीक लक्ष आहे.






