प्रभात वृत्तसेवा पेठ – आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवरील जैदवाडी गावातील सौरंग्या दत्तमंदिर परिसरात असलेल्या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धेाक्यात आले आहे. खेड तालुक्यातील जैदवाडी हायवेलगत असलेल्या या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सकाळच्या प्रकारात व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात काळा रंग असलेला धूर हवेत पसरतो. या परिसरातील वन्यजीवांना शेतकऱ्यांना या धुरामुळे मोठी अडचण होत आहे. ॲग्रीकल्चर झोन असलेल्या या परिसरात अशा कारखान्यांना प्रशासनाने परवानगी दिलीच कशी की हे असले कारखाने अवैध चालू आहे? याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे,यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.मंदिराच्या परिसरात शाळा, हॉटेल व्यवसाय व बटाट्याची शेतीही यामुळे अडचणीत आली आहे. परिसरातील एका कारखान्यातून सातत्याने निघणाऱ्या दाट धुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुरामुळे सतत दुर्गंधी पसरत असून श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिकांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासोबतच शेती पिकांवरही धुराचा विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. कारखान्याची तात्काळ तपासणी करून प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात ग्रामस्थ आहे.” – राजेंद्र कातोरे, माजी सरपंच, जैदवाडी