Tenant Verification: घरमालकांनो सावधान! भाडेकरूंची माहिती लपवाल तर थेट गुन्हा; लोणी काळभोरमध्ये पोलिसांची कारवाई
Tenant Verification: लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष शाखेची धडक तपासणी; पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी घरमालकांवर गुन्हे दाखल.

Tenant Verification – भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात नोंदवली नसल्यामुळे लोणी काळभोर परिसरातील तीन घरमालकांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष शाखेच्या पथकाने केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. वागसिंग, रोहिणी संजय वाघुले व दत्तात्रय बाबुराव खुणे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात (दि.४) जुलै ते (दि.१) सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी घरमालक, भाडेकरू आणि इस्टेट एजंट यांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे आदेश लागू आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.
आदेशाची व्यापक प्रसिद्धी करूनही काही घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले. विशेष शाखेच्या पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी केली असता, रोहिणी कॉम्प्लेक्स, लोणीगाव येथील घरमालक वागसिंग यांनी भाडेकरू सूरज अनुप गोस्वामी यांची माहिती पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे आढळून आले.
याच रोहिणी कॉम्प्लेक्समधील घरमालक रोहिणी संजय वाघुले यांनी भाडेकरू मिलिंद रावसाहेब शिंदे यांची माहितीही पोलिसांना दिली नव्हती. अष्टापुरे मळा रस्ता, घोरपडेवस्ती येथील श्रीराम निवास बिल्डिंगचे घरमालक दत्तात्रय बाबुराव खुणे यांनी भाडेकरू कुणाल शामराव साळुंखे यांची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंदवली नसल्याचेही तपासात उघड झाले.
तिन्ही प्रकरणांत घरमालकांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे. आपल्या घरात किंवा इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात वेळेत नोंदवावी. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी सर्व घरमालकांना दिला आहे.




