Pune Police: पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’! फटाके फोडणारे सायलेंसर अन् काळ्या काचा रडारवर
Pune Police: फक्त वाहनचालकच नाही तर मॉडिफिकेशन करून देणारे दुकानदार आणि गॅरेजवरही उगारला कारवाईचा बडगा.

Pune Police – रात्री- अपरात्री मॉडिफाइड बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्यांसारखा आवाज काढत नागरिकांना त्रास देणारे दुचाकीस्वार, कर्णकर्कश हॉर्नचा वापर करणारे वाहनचालक आणि नियमबाह्य मॉडिफिकेशन करणाऱ्या गॅरेजचालकांविरोधात पुणे पोलिसांनी ऑपरेशन मॉडिफिकेशन ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या तीन दिवसांत २७४ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून,
त्यांच्याकडून सुमारे २ लाख ७४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय ८४ मॉडिफाइड सायलेंसर जप्त केले आहेत. रविवार (२ ऑगस्ट) पासून सुरू झालेल्या या मोहिमेत शहरातील ३० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्थानिक पोलीस आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी नाके उभारून मॉडिफाइड सायलेंसर, अनधिकृत हॉर्न, वाहनांच्या काळ्या काचा, तसेच वाहनांमध्ये करण्यात आलेले नियमबाह्य तांत्रिक बदल यांची कसून तपासणी केली जात आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच आवश्यकतेनुसार वाहने जप्त करण्याचाही इशारा पोलिसांनी दिला आहे.
मागील काही वर्षांत बुलेटसह अन्य दुचाकींमध्ये नियमबाह्य सायलेंसर बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. या सायलेंसरमधून फटाक्यांसारखा मोठा आवाज होत असल्याने नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. त्यानंतर ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गॅरेजचालकांवर कारवाईचा बडगा
वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून देणाऱ्या गॅरेजचालकांवरही पोलिसांनी कारवाईची तयारी सुरू केली आहे. दुचाकींचे सायलेंसर बदलणे, कर्णकर्कश हॉर्न बसविणे, वाहनांचे नियमबाह्य मॉडिफिकेशन करणे, तसेच मोटारींना काळ्या काचा बसवून देणाऱ्या गॅरेजची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. प्रामुख्याने नाना पेठ,
स्वारगेट येथील वेगा सेंटर परिसरातील २५ ते ३० गॅरेज, तसेच हडपसर आणि वाघोली परिसरातील काही गॅरेज पोलिसांच्या रडारवर असून, या ठिकाणी सातत्याने वाहनांचे बेकायदेशीर मॉडिफिकेशन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
“शहरात बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. नियमबाह्य सायलेंसर लावून मोठा आवाज करणाऱ्या वाहनांवर आमचे विशेष लक्ष आहे. अशा सायलेंसरची विक्री करणारे दुकानदार आणि ते बसवून देणारे गॅरेजचालक यांच्यावरही कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती, फोटो किंवा व्हिडिओ वाहतूक पोलिसांच्या ॲपवर पाठवावेत.”
– संजय दराडे, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर






