MPDA Act: पोलीस आयुक्तांचा दणका! ३ सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध
MPDA Act: अवैध दारू विक्री व निर्मितीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या दोघांना हरसूल तर एकाची येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धता.

MPDA Act – सांगवी, उत्तर महाळुंगे आणि हिंजवडी परिसरातील तीन सराईत गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याखाली (झोपडपट्टी दादा विरोधी कायदा) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यातील दोघांना छत्रपती संभाजीनगर मधील हरसूल मध्यवर्ती कारागृह तर एकाला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडीबा आडेप्पा कांबळे (वय ३७, रा. पिंपळे गुरव) हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दारू विक्री सारखे नऊ गुन्हे दाखल आहेत. सांगवी पोलिसांनी त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात पाठवला होता. त्याचबरोबर उत्तर महाळुंगे पोलिसांनी जीवन मारुती राजपूत (वय ४८, रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे) याचा प्रस्ताव पाठवला होता.
राजपूत याच्यावर बेकायदेशीरपणे दारू तयार करणे, दारूची विक्री करणे असे १४ गुन्हे दाखल आहेत. हिंजवडी परिसरातील गुन्हेगार धनराज सोमाजी नट (वय ३५, रा. माण रोड, हिंजवडी) याच्यावर देखील दारू विक्रीबाबत चार गुन्हे दाखल असून त्याचाही प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कोंडीबा कांबळे आणि जीवन राजपूत हे दोघे हरसूल मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर धनराज नट हा येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. त्यांना आहे त्या ठिकाणी एक वर्ष स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. मागील सात महिन्यांमध्ये ११ आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.





