Ramdara Temple: लोणी काळभोर येथील प्रसिद्ध ‘रामदरा मंदिर’ दर्शनासाठी बंद; काय आहे कारण?
Ramdara Temple: यापूर्वी १८ जून ते १८ जुलै दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचे नियोजन होते, मात्र कामाचा दर्जा आणि प्रगती पाहून बंदचा कालावधी वाढवला.

Ramdara Temple – लोणी काळभोर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिर गर्भगृहासह मंदिर परिसरात सुरू असलेल्या दुरुस्ती व डागडुजीच्या कामांमुळे 1 सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. कामाच्या प्रगतीनुसार हा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे अध्यक्ष 1008 श्री महंत हेमंतपुरी महाराज यांनी दिली.
मंदिराच्या गर्भगृहासह परिसरातील विविध आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू असल्याने सुरुवातीला 18 जून ते 18 जुलै या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नियोजित मुदतीत काम पूर्ण होऊ न शकल्याने उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सध्या मंदिराच्या गर्भगृहात तसेच इतर संवेदनशील भागांमध्ये बांधकाम आणि डागडुजीची कामे सुरू असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत मंदिरात प्रवेश, नियमित दर्शन, वैयक्तिक पूजा-अर्चा तसेच इतर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. कामाच्या प्रगतीनुसार मंदिर बंद ठेवण्याचा कालावधी आवश्यक असल्यास आणखी वाढविण्यात येऊ शकतो, असेही मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाविक, भक्तगण आणि शिष्यांनी या निर्णयाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मंदिर बंद ठेवण्यासंबंधीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन 1008 श्री महंत हेमंतपुरी महाराज यांनी केले आहे.





