Syed Modi International 2024 : ट्रीसा-गायत्री जोडीनं पटकावले महिला दुहेरीचे विजेतेपद…

Syed Modi International 2024 (Women’s Doubles) : भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या महिला दुहेरी जोडीने रविवारी लखनौ येथे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या बाओ ली जिंग आणि ली कियान या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव करून पहिले सुपर 300 विजेतेपद पटकावले.
Winning moments!!🥇
Gold for Treesa Jolly and Gayatri Gopichand in women’s doubles at Syed Modi India International 🥇 pic.twitter.com/huFvSJuCLO
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 1, 2024
चीनमध्ये 11 ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्ससाठी (2024 BWF World Tour Finals) पात्र ठरलेल्या ट्रीसा आणि गायत्रीने (Treesa Jolly and Gayathri Gopichand Pullela) आपल्या चिनी प्रतिस्पर्ध्यांचा अवघ्या 40 मिनिटांत 21-18, 21-11 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या जोडीसाठी हा विजय ऐतिहासिक आहे, कारण ट्रीसा आणि गायत्री या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी ठरली आहे. ही जोडी 2022 च्या टप्प्यात उपविजेती ठरली होती.
पुरूष दुहेरी अन् मिश्र प्रकारात उपविजेतेपद…
स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताच्या पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक या जोडीनं तर मिश्र दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला यांच्या दुहेरी संघाने उपविजेतेपदावर आपली मोहीम संपवली.
71 मिनिटे चाललेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पृथ्वी आणि साई यांनी कडवे आव्हान उभे केले पण चीनच्या हुआंग डी आणि लिऊ यांग यांच्याकडून 14-21, 21-19, 17-21 असा पराभव स्विकारावा लागला. तर मिश्र दुहेरीत तनिषा आणि ध्रुव या पाचव्या मानांकित जोडीला अंतिम फेरीत थायलंडच्या डेचापोल पुवारानुक्रोह आणि सुपिसारा पायवसंप्रान यांच्याकडून 21-18, 14-21, 8-21 असा पराभव स्विकारावा लागला.





