Syed Modi International 2024 : भारताचा तिहेरी धमाका..! सिंधू अन् ‘त्रिशा-गायत्री’नंतर लक्ष्यनं पटकावले विजेतेपद….

Syed Modi International 2024 : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही सिंधू आणि महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनंतर पुरूष एकेरीतही भारताच्या लक्ष्य सेन याने चमकदार कामगिरी करताना विजेतेपद पटकावले आहे.
🇮🇳 All 3 of our Titles 🏆 were won in straight games 🔥
✨ MS 🏆 Lakshya Sen ✨
✨ WS 🏆 PV Sindhu ✨
✨ WD 🏆 Gayatri Gopichand / Treesa Jolly ✨🏸 Syed Modi India Int’l S300 pic.twitter.com/leBTPcGUgH
— Harini Raman (@ASimpleStardust) December 1, 2024
स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहशी झाला. 14व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय शटलरने 39व्या क्रमांकाच्या ‘जिया हेंग जेसन तेह’ (Jason Teh Jia Heng) याचा 21-6, 21-7 असा पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरलं.
पहिल्या गेममध्ये एकही संधी वाया न घालवता लक्ष्यने सिंगापूरच्या खेळाडूवर 8-0 अशी मोठी आघाडी घेतली आणि 21-6 असा आरामात विजय नोंदवला. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने चमकदार कामगिरी करत नऊ गुणांची आघाडी घेतली आणि आघाडी शेवटपर्यंत कायम राखत दुसऱ्या गेमसह (21-7) सामनाही खिशात टाकला. हा भारतीय शटलरचा पाचवा BWF वर्ल्ड टूर विजय होता आणि गेल्या वर्षीच्या कॅनडा ओपननंतरचे पहिले विजेतेपद आहे.
महिला एकेरीसह दुहेरीतही विजेतेपद…
दुसरीकडे अन्य गटातील स्पर्धेत भारताच्या अव्वल मानांकित सिंधु हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वू लुओ यूचा सलग गेममध्ये 21-14, 21-16 असा पराभव केला. तर त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरी जोडीने चमकदार कामगिरी करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्रिशा-गायत्री जोडीने अंतिम फेरीत चीनच्या बाओ ली जिंग आणि ली कियान यांचा अवघ्या 40 मिनिटांत 21-18, 21-11 पराभव केला.





