शिक्रापूर -करोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना सर्वसामान्य नागरिक कर्जबाजारी पणामुळे हवालदिल झालेले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी दाखले अडवून शुल्क वसुली करण्यात येत आहे, ती वसुली थांबवावी असे आदेश शिक्षण महासंचालक औदुंबर उकिरडे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाऱ्यांना दिले आहेत.
शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्था संचलित प्रतिमा पलांडे स्कूल येथे करोना काळात लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षण सुरु असताना तसेच लॉकडाऊन काळामुळे सर्वसामान्य नागरिक कर्जबाजारी झालेले आहेत. तरीही प्रतिमा पलांडे स्कूल येथे विद्यार्थ्यांची शालेय शुल्कासाठी अडवणूक करत विद्यार्थ्यांचे दाखले देखील अडवले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर हवेली तालुकाध्यक्ष तेजस यादव यांनी शिक्षण महासंचालक यांच्याकडे केली होती.
त्यानंतर नुकतेच शिक्षण महासंचालक औदुंबर उकिरडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देत विद्यार्थ्यांना ऑनलाइन / ऑफलाइन शिक्षणापासून वंचित न ठेवता व शाळा सोडल्याचे दाखले शासन नियमानुसार निर्गमित करण्याबाबत आदेश शिक्रापूर येथील प्रतिमा पलांडे स्कूलला देऊन योग्य कार्यवाही करुन कार्यवाहीचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाऱ्यांना दिले आहेत.