गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, काच फुटून दगड… नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

गेवराई : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी आणि झटापट झाली. यावेळी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यामुळे गाडीच्या पुढील काचेचे नुकसान झाले. तसेच चप्पल भिरकावण्याच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप केला.
पुतळा दहनावरून तणाव –
या घटनेची सुरुवात काल गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन झाल्याने झाली. त्यानंतर हाके स्वतः छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले, तेव्हा तिथे विजयसिंह पंडित यांचे समर्थकही जमले होते. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देणारे बॅनर चौकात लावण्यात आले होते, ज्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. काही आक्रमक कार्यकर्त्यांनी हाकेंच्या गाडीवर दगडफेक केली, तसेच दंडुके आणि चपलांचा वापर करून वातावरण तंग झाले. हाकेंनाही मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
पोलिसांचा बंदोबस्त, हाकेंना बाहेर काढले –
घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तरीही परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण हाकेंना सुरक्षितपणे बीडच्या दिशेने रवाना केले. दोन्ही गटांच्या आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, चौकात तणाव कायम होता.
विजयसिंह पंडित यांचे वक्तव्य –
आमदार विजयसिंह पंडित यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले, “लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करण्याचे कुटील कारस्थान रचत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरोधात वक्तव्ये करत आहेत. आम्ही त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना प्रतिक्रिया दिली नाही. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.”
पोलिसांचे नियंत्रणाचे प्रयत्न –
गेवराई शहरातील तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.





