BJP vs Congress – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे केलेल्या आंदोलनाचे दगडफेकीचे रूपांतर आले. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होऊन एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. कार्यकर्त्यांनी तेथे उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली; शिवाय दगडफेकीत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार जखमी झाले. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याने भाजपने काँग्रेस भवनासमोर आंदोलन पुकारले. हे आंदोलन शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्त्वाखाली दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले. यामध्ये महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी सपकाळ यांच्या आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केले, तसेच विरोधात काँग्रेस भवनसमोर जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तेथे बॅरीकेड्स लावले होते. त्याच्या पलिकडे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. त्याच वेळी भवनच्या आतमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी मोदी आणि अडाणी यांचे पोस्टर आणि एपस्टिन फाइलशी संबंध जोडून विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूने एकमेकांवर कुरघोडी करत घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या गेटवर चढले. पोलिसांनाही नियंत्रण करणे अवघड झाले. त्याच वेळी दगडफेकीला सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमधील शाब्दिक खडाजंगी हमरीतुमरीवर आली आणि आंदोलनाचे स्वरूप दगडफेकीत झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यात महिला पोलीस, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि पत्रकार जखमी झाले.