Pune Congress – काँग्रेस भवन येथे भाजपने आंदोलन करुन दगडफेक केली. भाजप राजकीय दहशतवाद माजवत असून या प्रकरणात पुणे पोलीस पक्षपातीपणे कारवाई करत आहेत. पोलिसांनी काँग्रेस भवन येथे आंदोलनाला परवानगी दिली कशी?, आंदोलकांना पोलिसांनी का अडवले नाही असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले असून येत्या आठवड्यात पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ पुणे भाजपने काँग्रेस भवन येथे रविवारी आंदोलन केले. कॉंग्रेस, भाजपचे कार्यकर्ते समोरा समोर आल्यानंतर दगडफेक झाली. त्यात काही जण जखमीही झाले. पुणे पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. काँग्रेसने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कॉंग्रेस भवनात बैठक घेण्यात आली. त्यानंतर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकारांना माहिती दिली. पुणे पोलीस भाजपबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला जात आहे. भाजपच्या काही जणांवर गुन्हेच दाखल केले नाहीत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्याची मागणीही काँग्रेस करत आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनात जखमी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची विचारपूसही केली आहे. ते पुण्यातही येणार आहेत.