Stone Crusher Accident: लोणीकंदमध्ये मोठी दुर्घटना! स्टोन क्रशरमध्ये अडकून १७ वर्षीय अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
Stone Crusher Accident: अल्पवयीन मुलाकडून धोकादायक काम करून घेतल्याचा अन् सुरक्षेची साधने न पुरवल्याचा आरोप; पोलिसांकडून ३ ठेकेदारांवर गुन्हा दाखल.

Stone Crusher Accident- पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद येथे स्टोन क्रशरमध्ये (खडी मशीन) अडकून १७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाला कामावर ठेवून त्याच्याकडून धोकादायक काम करून घेणे तसेच सुरक्षाविषयक साधने पुरविली नसल्याने लोणीकंद पोलिसांनी साईराम स्टोन क्रशरच्या तीन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रिन्स विजयसिंग धुर्वे ( १७) याचा मृत्यू झाला आहे.
पोलीस हवालदार अजित कुऱ्हे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ठेकेदार दिलीप संभाजी शिळीमकर ( ४०, रा. वाघोली), सत्यजीत अशोक जाना ( ३५, रा. वाघोली) आणि अमित भगवान अकोलकर (रा. रावेत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रिन्स धुर्वे हा मूळचा मध्य प्रदेशातील बिजोरीगाव, करंजिया, दिंडोरी येथील रहिवासी होता.
तो दोन महिन्यांपासून लोणीकंद येथील साईराम स्टोन क्रशरमध्ये काम करीत होता. प्रिन्स अल्पवयीन असतानाही त्याच्याकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोनला स्टोन क्रशर मशिनमध्ये अडकून प्रिन्स गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चौकशीत प्रिन्सला कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाविषयक साधने पुरविली नसल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक विलास मोटे तपास करीत आहेत.





