Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील चोरट्यांवर सर्जिकल स्ट्राईक! ५६ तासांच्या मोहिमेत १५ जणांना ठोकल्या बेड्या
Pune Crime: विश्रामबाग, फरासखाना आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग ५६ तास राबवली विशेष मोहीम; आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

Pune Crime- गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्रे, पर्समधील दागिने तसेच मोबाईल आणि पाकीट चोरणाऱ्या १५ जणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या कारवाईत विश्रामबाग, फरासखाना आणि चंदननगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी सलग ५६ तास कारवाई करून ही कामगिरी केली. अटक आरोपींपैकी संतोष कान्हू पवार (रा. अहिल्यानगर), जालिंदर शयीराव वाघमारे (रा. गजानननगर, बीड), सुशांत शिवाजी गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी, लातूर), गफर मौला शेख (रा. नामपल्ली, हैदराबाद) आणि शेख सैबाज शेख शफीक (रा. मालेगाव, नाशिक) यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांत २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने राज्यातील तसेच परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय होतात. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी विश्रामबाग पोलिसांना विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके आणि त्यांच्या पथकाला गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालून चोरट्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी साध्या वेशात निगराणी ठेवून १५ संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची माहिती समोर आली.
या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात सोन्याचे दागिनेचोरीचे १५, मोबाईल चोरीचे तीन आणि पाकीट चोरीच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. तसेच, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोन्याचे दागिने चोरीचे तीन आणि चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला आहे. अशा प्रकारे एकूण २२ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सुरू झाली असून, २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत, सलग ५६ तास पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन केली. पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, पोलीस निरीक्षक रमेश लाहिगुडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.






