Dog Attack: धक्कादायक प्रकार! पाळीव कुत्र्याचा १२ वर्षांच्या मुलावर हल्ला; चेहऱ्याला तब्बल आठ टाके
Dog Attack: तोडाला पट्टी न लावता व साखळीने न बांधता कुत्रा मोकळा सोडल्याचा आरोप; वडील विनोद दूमणे यांच्या फिर्यादीवरून तपस्विनी शिंदे यांच्यावर गुन्हा.

Dog Attack- वडगाव शेरीमध्ये मोकाट सोडलेल्या पाळीव लॅब्रेडॉर कुत्र्याने १२ वर्षांच्या मुलावर हल्ला चढवत चेहऱ्याचा चावा घेतला. हल्ल्यात मुलाच्या ओठाजवळ गंभीर दुखापत झाली असून चेहऱ्यावर आठ टाके घालावे लागले आहेत. याप्रकरणी कुत्र्याची मालकिण तपस्विनी कुणाल शिंदे (रा. शिंदे बिल्डिंग, वडगाव शेरी) हिच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुलाचे वडील विनोद सुदामराव दूमणे (४२) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दूमणे आणि शिंदे हे शिंदे बिल्डिंगमध्ये शेजारी राहतात. शिंदे यांनी लॅब्रेडॉर जातीचा कुत्रा पाळला आहे. मात्र, कुत्र्याला साखळीने बांधून न ठेवता, तसेच तोंडाला पट्टी न लावता मोकळे सोडले जात असल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. इमारतीच्या परिसरात लहान मुले खेळत असतात. कुत्रा यापूर्वीही नागरिक आणि मुलांच्या अंगावर धावून जात असल्याने त्याला बांधून ठेवावे,
तसेच तोंडाला पट्टी लावावी, अशी सूचना शेजाऱ्यांनी शिंदे यांना केल्याचा दावा दूमणे यांनी केला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाला अर्णव घरासमोर खेळत असताना कुत्रा त्याच्या अंगावर धावून आला. त्याने अर्णववर हल्ला करत चेहऱ्याचा चावा घेतला. मुलाने आरडाओरड केल्यानंतर वडील बाहेर आले आणि त्यांनी कुत्र्याला तेथून हाकलून दिले.
त्यानंतर जखमी अर्णवला वडगाव शेरी येथील सागर नर्सिंग होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावर आठ टाके घातले. कुत्र्याची योग्य काळजी न घेता, त्याला मोकळे सोडल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत दूमणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी तपस्विनी शिंदे यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार लिंगाण्णा तपास करीत आहेत.





