Stock Market Updates 4 January 2024: दोन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात निर्देशांकात आज चांगली वाढ झाली. बँकिंग, एनर्जी, एफएमसीजी, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे बाजारात वाढ झाली आहे. निफ्टी मिड कॅप निर्देशांकाने 800 अंकांच्या उसळीसह विक्रमी उच्चांक गाठला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 491 अंकांच्या उसळीसह 71,847 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 141 अंकांच्या उसळीसह 21,658 अंकांवर बंद झाला.
बँकिंग, एफएमसीजी, एनर्जी, मीडिया आयटी, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरमधील शेअर्स मोठ्या वाढीसह बंद झाले. रियल समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. रिअल स्टॉक इंडेक्स निफ्टी रिअॅल्टी 6.72 टक्क्यांच्या वाढीसह उच्चांकावर बंद झाला आहे. निफ्टी मिड कॅप निर्देशांक आणि स्मॉल इंडेक्समध्येही विक्रमी वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 वाढीसह बंद झाले तर 12 समभाग घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 29 समभाग वाढीसह आणि 21 समभाग घसरणीसह बंद झाले.
मार्केट कॅप विक्रमी उच्च पातळीवर –
भारतीय शेअर बाजारातील वाढीमुळे सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलाने विक्रमी उच्चांक गाठले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 368.43 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 365.10 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या व्यापारात बाजार भांडवलात 3.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात बजाज फायनान्स 4.30 टक्के, एनटीपीसी 3.51 टक्के, इंडसइंड बँक 2.90 टक्के, अॅक्सिस बँक 2.45 टक्के, पॉवर ग्रिड 1.94 टक्के वाढीसह बंद झाले. एचसीएल टेक 1.29 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.96 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.88 टक्के, विप्रो 0.83 टक्के घसरणीसह बंद झाले.