मुंबई – जागतिक शेअर बाजारात आगामी आठवड्यात बऱ्याच सुट्या येणार आहेत. त्यामुळे जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक शुक्रवारी माफक प्रमाणात कमी झाले. काही गुंतवणूकदार अनिश्चित परिस्थितीमुळे नफा काढून घेत आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 190 अंकांनी कमी होऊन 57,124 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 0.40 टक्क्यांनी म्हणजे 68 अंकांनी कमी होऊन 17,003 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक, महिंद्रा, ऍक्सिस बॅंक, पावर ग्रिड, कोटक बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. तर एचसीएल टेक्, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसीस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. एलकेपी सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक एस रंगनाथन यांनी सांगितले की, सरलेल्या आठवड्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने निर्देशांकांना चांगला आधार दिला.
महागाई वाढणार असल्यामुळे देशातील आणि परदेशातील शेअर बाजारात अस्थिरता आहे. कर संकलन वाढले आहे. त्याचबरोबर उत्पादन आधारित अनुदान योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही क्षेत्रामध्ये अजूनही उत्पादकता वाढलेली नाही. त्यामुळे निर्देशांक अस्थिर आहेत. युरोप आणि आशियाई शेअर बाजारातून आज संमिश्र संकेत आल्यामुळे गुंतवणूकदारांना निश्चित निर्णय घेणे अवघड झाले होते.
डॉलर वधारत असल्यामुळे आणि अमेरीका व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. काल या गुंतवणूदारांनी 271 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. या गुंतवणूदारांची भारतीय शेअर बाजारात 25 टक्के इतकी गुंतवणूक आहे.
आयटी क्षेत्र आघाडीवर राहणार
करोनामुळे घरातून काम करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे माहीती तंत्रज्ञान कंपन्याची उलाढाल वाढली आहे. डॉलर वधारत असल्यामुळे रूपयाचे मुल्य कमी झाले आहे. त्यामुळे माहीती तंत्रज्ञान कंपन्याच्या निर्यातीची उलाढाल वाढणार आहे. या कारणामुळे माहीती तंत्रज्ञान क्षेत्रासह निर्यात करणारी औषधी आणि इतर क्षेत्र तेजीत राहण्याची शक्यता आहे.