पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या वतीने कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाजवळ पहिला डॉग पार्क सुरू करण्याला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) ने अजूनही परवानगी दिलेली नाही. ती मिळेल की नाही याविषयीही संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेने २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात राजीव गांधी प्राणीसंग्रहालय परिसरात पाच एकर क्षेत्रफळ असलेले पहिले डॉग पार्क जाहीर केले होते. यासाठी आरोग्य विभागाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे डॉग पार्कसाठी या जागेची मागणी केली होती. मात्र, ही जागा ग्रीनबेल्टमध्ये येत असल्याने परवानगी मिळण्याला अडचण येत आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात पाळीव प्राणी मनाई आहे. त्यामुळे ही परवानगी सुरुवातीला नाकारण्यात आली होती. मात्र, महापालिकेने प्राधिकरणाला पुनर्विचारासाठी विनंतीपत्र लिहिले. त्यामध्ये हा भूखंड वन्य प्राण्यांच्या ठिकाणापासून खूप दूर आहे आणि त्याचा चांगला वापर केला जाईल, असे नमूद केले होते. त्यावर प्राधिकरणाने प्रस्तावाला तपशीलवार प्लॅन जोडण्यास सांगितले.
त्यानुसार तो जोडून पुन्हा जानेवारी महिन्यात प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये ग्रीन बेल्टमध्ये डॉग पार्क नियोजित आहे; परंतु प्रस्तावित डॉग पार्क प्राणीसंग्रहालय क्षेत्र वेगळे करून उभारले जाईल. प्राणीसंग्रहालय आणि प्रस्तावित डॉग पार्क यांच्यामध्ये एक भिंत उभारली जाईल, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
डॉग पार्कसाठीचा नियोजित भूखंड प्राणीसंग्रहालयाच्या वर बांधलेल्या ओव्हरब्रिजखाली आहे. २०२१ मध्ये प्राधिकरणाने ने प्राणीसंग्रहालयाच्या दक्षिण भागात राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे खांब बांधण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या भूखंडावरील प्राणीसंग्रहालयाच्या विस्तारास प्राधिकरणाने यापूर्वी परवानगी नाकारली होती. त्यामुळे ही जागा डॉग पार्कसाठी वापरण्याचा महापालिकेचा विचार होता.
अतिक्रमणाचा धोका
खांबामुळे ही जागा प्राणीसंग्रहालयासाठी वापरता येणार नव्हती म्हणून येथे डॉग पार्कचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी पाच एकर जागा पुरेशी होती म्हणून तेथे नियोजन करण्यात आले होते. त्यावर काहीच केले नाही, तर त्यावर अतिक्रमण होऊ शकते. शहरात विविध ठिकाणी किमान पाच डॉग पार्क बनवण्याची योजना आखली होती, त्यासाठी जागा मिळण्याची वाट पाहात आहोत, अशी माहिती महापालिकेतील आरोग्य विभागाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी नाकारली नाही. डॉग पार्कसाठी जो प्रस्ताव दिला होता, त्याला तपशीलवार प्लॅन जोडला नव्हता. तो जोडून पाठवण्याबद्दल प्राधिकरणाने कळवले होते. तो जोडून पुन्हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे प्रकल्पाला परवानगी मिळण्याला आता काही अडचण येऊ नये. आम्ही त्यांच्या परवानगीची वाट पाहात आहोत. – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे