तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तळेगाव दाभाडे आगारातून खानदेशीतील प्रवाशांसाठी तळेगाव ते चोपडा ही एसटीची बस सुरु करण्यात आली आहे. खानदेशी युवा मंचाचे उमेश पाटील व पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मावळ तालुक्यात अनेक खानदेशी बांधव नोकरी निमित्त स्थायिक झालेले आहेत. त्याना गावी जाताना रेल्वे किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. हा प्रवास खूप खर्चिक व त्रासदायक होता.
यासाठी खानदेशी युवा मंच यांच्यामार्फत तळेगाव ते चोपडा बस सुरु करण्याची मागणी एसटी महामंडळ व आमदार सुनील शेळके यांच्याकडे ११ महिन्यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार आमदार शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्याने १४ एप्रिलपासून तळेगाव दाभाडे येथून शिर्डी, धुळे, अंमळनेर, चोपडा या मार्गे एसटीला हिरवा कंदील मिळला आहे. दररोज सकाळी साडेसहाच्या सुमारास एसटी बस तळेगाव आगारातून मार्गस्थ होणार आहे.
यावेळी खान्देश विकास युवा मंचाचे डॉ. शाळीग्राम भंडारी, डॉ. रोहित मनीयार, डॉ. युवराज बडे, रविंद्र पाटील, मनोहर पगारे, भरत देसले, रविंद्र साळूंके, मुकेश पाटील, शिवाजी पाटील, नितीन पाटील, गोविंद पवार, जयंत संदानशिव, विजयकुमार राठोड, विजय चौधरी आणि तळेगाव परिसरात राहणारे खान्देशवासी बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एसटीचे वाहक व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त केला.