IPL 2024 (SRH vs GT Match 66) : पावसामुळं हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट..! गुजरात विरुद्धचा सामना रद्द, दिल्ली-लखनौ संघ बाद…

IPL 2024 (SRH vs GT Match 66 Update) :-आयपीएल 2024 च्या 66 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना गुजरात टायटन्सशी होता. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे ना टाॅस झाला ना सामना. आयपीएल 2024 चा 66 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
🚨 Update from Hyderabad 🚨
The match between Sunrisers Hyderabad and Gujarat Titans has been called off without a ball being bowled.
Both teams share a point each#TATAIPL | #SRHvGT
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2024
हैदराबादमध्ये सनरायझर्स संघ गुजरातचा सामना करणार होता. मात्र, नाणेफेकीपूर्वीच पाऊस सुरू झाल्याने नाणेफेक होऊ शकली नाही. साडेसातच्या सुमारास पाऊस काही काळ थांबल्याने सामना अर्धा तास उशिराने सुरू होईल असे वाटत होते. नाणेफेकीची वेळ 8 वाजता आणि सामना 8.15 वाजता सुरू होण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती, परंतु 8 वाजून पाच मिनिटे आधी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि पुन्हा थांबलाच नाही.
पाच-पाच षटकांच्या सामन्यासाठी 10.30 ची कट ऑफ टाइम होता. मात्र, मैदान ओले होते आणि मैदानाच्या अनेक भागात पाणी साचले होते. अशा स्थितीत पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांशी बोलून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आणि पावसामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.
हैदराबादचे आता 13 सामन्यांतून 15 गुण झाले आहेत आणि संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज वगळता इतर कोणत्याही संघाला 15 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळू शकत नाहीत. या स्थितीत सनरायझर्स प्लेऑफसाठी पात्र ठरले. हैदराबादपूर्वी कोलकाता आणि राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचले होते.
चेन्नईचे 13 सामन्यांनंतर 14 गुण आहेत. 18 मे रोजी संघाला बेंगळुरूशी सामना करावा लागणार आहे. बेंगळुरूचे 12 गुण आहेत. त्याचवेळी, आता दिल्ली आणि लखनौ हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. दोघांचा नेट रन रेट नकारात्मक आहे आणि तो कव्हर करणे कठीण होईल. त्यामुळे, चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना आभासी नॉकआउट असेल.
दरम्यान, पावसाने व्यत्यय आणलेला या मोसमातील हा तिसरा सामना आहे. यापूर्वी कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्यावरही पावसाचा परिणाम झाला होता. तो सामना दोन तास 15 मिनिटे उशीराने सुरू झाला आणि तो 16-16 षटकांचा होता. त्याचवेळी गुजरातचा कोलकातासोबतचा मागील सामना पावसामुळे वाहून गेला होता. हैदराबाद-गुजरात सामना हा पावसामुळे वाहून गेलेला दुसरा सामना आहे.





