“एकजण दिल्लीत गेलाय, बाबा मला मारलं…”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर जिव्हारी लागणारा वार

Uddhav Thackeray : राज्यात सध्या फोडाफोडाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. याला कारणही तसेच आहे, भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग वाढले आहे. महायुतीमधील मित्रपक्षातील म्हणजेच शिवसेनेतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिले जात आहे. यामुळे शिंदेंसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर काल एक मोठी घडामोड घडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीत जावून केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांची ५० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शिंदेंनी भाजपच्या याच कृत्यावरुन शाहांपुढे तीव्र नाराजी व्यक्त केली. अशातच आता शिंदेंनी अमित शाहांची घेतलेली भेटी यावर मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
आता आपण पाहतोय आता एकजण दिल्लीत गेलाय, बाबा मला मारलं म्हणत गेलाय. लहानपणी चांगले शिक्षक लाभले असते तर ही वेळ आली नसती, अशी जिव्हारी लागणारी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना विविध मुद्यावर भाष्य केले. सरकारमध्येच एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहेत. दुसरा देईल ती रेवडी आम्ही केले ते उपकार असं सध्याचे राजकारण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“आताच तुम्ही म्हणालात दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे? जे दिवटे बाहेर पडले त्यांना मशालीचे महत्व कळणार नाही. सध्या आमदार निधीवरून काय सुरू आहे, याची कल्पना सगळ्यांना आहे. विरोधकांची नस दाबलीच आहे, आता त्यांच्यातही (महायुती) निधीवरून नस दाबली गेली आहे. आता आपण पाहतोय आता एकजण दिल्लीत गेलाय, बाबा मला मारलं म्हणत गेलाय. लहानपणी चांगले शिक्षक लाभले असते तर ही वेळ आली नसती.”





