प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना भाजपकडून शहरात बैठकींचा जोर वाढला आहे. स्वबळावर लढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची भूमिका भाजपकडून घेतली जात आहे. त्यामुळे महायुतीत लढण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्याच वेळी भाजपला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. परिणामी, पुण्यात महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे. जवळपास सर्व प्रभागांत इच्छुकांची मोठी संख्या असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महायुती नको, अशी भूमिका वरिष्ठांकडे मांडली आहे. वरिष्ठांकडूनही युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असा निर्देश देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम दिसत आहे.त्यातच भाजपकडून युतीबाबत कोणताही स्पष्ट प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेतही अनिश्चितता आहे. शिवसेनेचाही स्वबळाचा नारा शिवसेनेची महायुतीतून निवडणूक लढण्याची तयारी आहे. मात्र, निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले. युती झाली तर आम्हाला ४० ते ४५ जागांची अपेक्षा आहे, तसेच युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी ४१ प्रभागांत इच्छुकांना तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तरीदेखील पुण्यात भाजपसोबत युती होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे मनोमिलनाचे संकेत भाजपकडून सावध भूमिका घेतली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग रचनेत ११ प्रभाग अनुकूल मिळावेत, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. मात्र, भाजपकडून कोणताही प्रतिसाद न दिल्याने राष्ट्रवादी नाराज आहे. त्यातच युतीविषयीही अद्याप स्पष्ट संकेत मिळालेला नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावेत, अशी मागणी होत आहे, तसेच महापालिका निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यास आम्ही तयार असल्याचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांनी स्पष्ट केले. मात्र, अंतिम निर्णय अजित पवार घेतील, असेही त्यांनी नमूद केले.