Social Media Rumors: ‘१२३ महिलांचे दिवसाढवळ्या अपहरण?’ पुणे-पिंपरीतील ‘त्या’ भितीदायक मेसेजमागील धक्कादायक सत्य बाहेर
Social Media Rumors: फोन न उचलल्यास पालकांमध्ये प्रचंड भीती; सोशल मीडियावरील खोडसाळ दाव्यांमुळे शहरात भीतीचे सावट, पोलिसांची कारवाईची तयारी.

– संदीप घिसे
Social Media Rumors- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सोशल मीडियावर एका भितीदायक व्हिडिओ, ऑडिओ आणि मेसेजने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. “शहरातून महिलांची सर्रास पळवापळवी सुरू असून तब्बल १२३ महिलांचे दिवसाढवळ्या अपहरण झाले आहे,” अशा आशयाचे मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तुफान व्हायरल होत आहेत.
काही महिला स्वतःसमोर हा प्रकार घडल्याचा आव आणत ‘पोलिसांनीच हा आकडा अधिकृतपणे जाहीर केला आहे’ असा दावा करून समाजात भीतीचे वातावरण तयार करत आहेत. मात्र, या निव्वळ भितीदायक अफवा असून शहरात कोणत्याही टोळीकडून महिलांची जबरदस्तीने पळवापळवी झालेली नाही, हे आता अधिकृत तपासात स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांत व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या या खोट्या प्रचारामुळे नागरिक, विशेषतः पालक आणि तरुणींमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सोशल मीडियावरील मेसेजमध्ये थेट पोलिसांचा हवाला देऊन “१२३ महिलांचे अपहरण झाले” असा खोडसाळ दावा केला जात आहे. मात्र, यातूनच या दाव्यातील फोलपणा उघडा पडतो.
जर प्रत्यक्ष किडनॅपिंग झाले असते, तर पीडित महिला स्वतः येऊन पोलिसांना ही आकडेवारी सांगणे शक्यच नव्हते. मग नेमका हा आकडा आला कुठून? या प्रश्नाचा छडा लावला असता, सर्वोच्च न्यायालयाच्या एका मार्गदर्शक तत्त्वाचा जाणीवपूर्वक विपर्यास करून ही खोटी दहशत पसरवली गेल्याचे समोर आले आहे.
म्हणून वाढला आकडा.
कौटुंबिक कलह अन् प्रेमप्रकरणे मुख्य कारण
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि बेपत्ता प्रकरणांच्या विश्लेषणात एक महत्त्वपूर्ण वास्तव समोर आले आहे. दाखल झालेल्या बहुतांश प्रकरणांमध्ये महिला किंवा पुरुष हे स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रेमसंबंधातून घरातून पळून जाणे, विवाहबाह्य संबंध, सासरचा किंवा घरगुती मानसिक त्रास, सततचे कौटुंबिक वाद,
आर्थिक विवंचना तसेच नैराश्याला कंटाळून अनेक व्यक्ती स्वतःहून निघून जातात. अशा प्रकरणात कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार करतात आणि न्यायालयाच्या नियमानुसार तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे अशा प्रकरणांचा संबंध रस्त्यावरून होणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या किडनॅपिंगशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे.
पोलिसांची भूमिका
”सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता कोणतीही व्यक्ती, अगदी ८० वर्षांचे वयोवृद्ध महिला किंवा पुरुष बेपत्ता झाले तरी नियमानुसार अपहरणाचाच गुन्हा दाखल करून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जाते. गेल्या महिन्यापासून या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाल्याने गुन्ह्यांची संख्या अधिक दिसत आहे.
हाच आकडा उचलून सोशल मीडियावर पळवापळवीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. शहरात कोणालाही जबरदस्तीने गाडीत डांबणे, खंडणी मागणे किंवा टोळीकडून किडनॅपिंगचे कोणतेही प्रकार घडलेले नाहीत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि भीती बाळगू नये.”
– रोहिदास पवार (पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा)
अफवा पसरविणे धोकादायक
सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांचा जनमानसावर विपरीत परिणाम होत आहे. या अफवांमुळे अनेक पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. मुली किंवा महिलांचा फोन न लागल्यास अथवा रिसीव्ह न केला गेल्यास पालक घाबरत आहेत. दुसरे म्हणजे तरुणी आणि महिलाच आरोग्य आणि पिरीयड्सचे कारण देऊन अपहरण करत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.






