Gandhi Jayanti: गांधी जयंतीला हिंजवडीत मुलांचा अनोखा उपक्रम! पथनाट्यातून दिला सामाजिक संदेश
Gandhi Jayanti: गांधी जयंतीनिमित्त मारुंजी येथील नवक्षितिज संस्थेच्या विशेष मुलांकडून हिंजवडीतील शिवाजी व लक्ष्मी चौकात जनजागृती पदयात्रा आणि पथनाट्य.

Gandhi Jayanti- महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मारुंजी येथील नवक्षितिज संस्थेच्या विशेष मुलांनी आणि प्रौढ कलाकारांनी हिंजवडीच्या शिवाजी व लक्ष्मी चौकात पथनाट्य आणि पदयात्रेतून स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेश दिला.नागरिकांमध्ये स्वछता आरोग्य व सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्याबरोबरच विशेष मुलांमधील आत्मविश्वासाला व्यासपीठ देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. शिवाजी चौकात ‘स्वच्छता ही सेवा’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
नितीन गायकवाड यांनी लेखन व दिग्दर्शन केले. पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन, तर भरत गायकवाड यांनी सहकार्य केले. नागेश, प्रखर, अमोल, विशाल, मिहीर, अंकुर, पौर्णिमा, मनाली, संध्या, अदिती आणि आदित्य यांनी भूमिका साकारल्या. शिवाजी चौकातील सादरीकरणानंतर कलाकारांनी जनजागृतीपर फलकांसह पदयात्रा काढत लक्ष्मी चौकात ही व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर केले. हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी कलाकारांच्या आत्मविश्वासाचे आणि सादरीकरणाचे कौतुक केले. प्रतीक चव्हाण यांनी दिग्दर्शन केले, तर प्रथमेश गाड यांनी सूत्रसंचालन केले. कौशिक वैद्य, कुणाल शेवडे, वंश नेहरा, शंतनू अष्टीकर, प्रफुल ब्रह्मे, गौतम घाटे, विक्रांत अशेर आणि तुषार घाटे यांनी अभिनयातून व्यसनांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडला.“बौद्धिक अक्षम व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी संधी मिळावी,
त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा,” या उद्देशाने नवक्षितिजकडून गेल्या १५ वर्षांपासून गांधी जयंतीनिमित्त संस्थेच्या तीन शाखामध्ये हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती नवक्षितिज संस्थेचे प्रशासक पांडुरंग आलुरकर यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई आणि कार्यकारी विश्वस्त स्मिता शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा उपक्रम पार पडला.





