Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश
Pune News: नोव्हेंबर-डिसेंबरमधील प्रथम सत्र परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त भागातील सर्व पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश.

Pune News- राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफ करण्यासोबतच त्यांना विविध प्रकारे मदत पुरविण्यासाठी विद्यापीठ स्तरावर विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर-डिसेंबरधील प्रथम सत्र परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त भागातील सर्व पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये,
असे स्पष्ट निर्देश राज्यातील सर्व विद्यापीठांसह महाविद्यालयांना दिले आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाइन बैठकीत हे निर्देश देण्यात आले. मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीस विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी आणि उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,
सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव व प्राचार्य उपस्थित होते. केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता उच्च शिक्षण क्षेत्राने एका कुटुंबासारखे एकत्र येऊन परिस्थितीचा सामना केला पाहिजे. सक्षम महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त भागातील संस्था व विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण संचालनालयात स्वतंत्र कक्ष आणि प्रत्येक विद्यापीठात टास्क फोर्स कार्यरत असेल. या सर्व कामांचा दर १५ दिवसांनी आढावा घेणार असून, दुष्काळामुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही, असेही ते म्हणाले.





