YCM Hospital: वायसीएम रुग्णालयात औषधांचा ठणठणाट! निविदा निघूनही खरेदी रखडली; गरीब रुग्णांच्या खिशाला फटका
YCM Hospital: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तांत्रिक अडचणींमुळे औषध पुरवठा खंडित; गरजू रुग्णांना महागडी औषधे बाहेरून खरेदी करण्याची वेळ.

YCM Hospital- शहरातील महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये औषध टंचाई निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून आवश्यक निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण होऊनही औषधांची प्रत्यक्ष खरेदी करण्यात येत नसल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली गोळ्या-औषधे खासगी मेडिकलमधून महागड्या दराने विकत घ्यावी लागत आहेत.
वायसीएम रुग्णालय हे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. दररोज हजारो रुग्ण या ठिकाणी बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभागात उपचारासाठी येतात. नियमानुसार, रुग्णांना पालिकेमार्फत मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधे मिळणे अपेक्षित आहे.
या औषध पुरवठ्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया देखील राबवली आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई आणि उदासीनतेमुळे निविदा मंजूर होऊनही औषधांचा साठा रुग्णालयाला प्राप्त झालेला नाही. तांत्रिक अडचणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संथ कारभारामुळे ही खरेदी प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे. रुग्णालयातील औषध भांडारात सध्या अनेक जीवनरक्षक औषधे, अँटीबायोटिक्स, वेदनाशामक गोळ्या आणि अगदी प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्यही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर रुग्णांच्या हातात थेट खासगी मेडिकलमधून औषधे आणण्याच्या चिठ्ठ्या (प्रिस्क्रिप्शन) दिल्या जात आहेत. वायसीएम रुग्णालयात येणारा बहुतांश वर्ग हा कामगार, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहे. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही म्हणून नागरिक येथे येतात, मात्र येथे आल्यावरही औषधांसाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
औषधसाठ्याची तपासणी करा
वायसीएम रुग्णालयातील उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधांच्या साठ्याची तातडीने तपासणी करावी. दैनंदिन उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांची आपत्कालीन पद्धतीने खरेदी करून ती रुग्णांना रुग्णालयातूनच विनामूल्य द्यावीत. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, बालरोग आणि अन्य गंभीर आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा कायम ठेवावा. औषध वितरण केंद्राबाहेर उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधांची अद्ययावत यादी दररोज प्रसिद्ध करावी.
औषधांच्या कमतरतेस जबाबदार असलेले अधिकारी, पुरवठादार अथवा कंत्राटदार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्यास सांगितले जात असल्यास संबंधित विभागाकडून लेखी स्पष्टीकरण घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
“वायसीएम रुग्णालयात मागील दोन-चार दिवसात गोळ्या-औषधाची टंचाई निर्माण झाली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे ठेकेदार कंपन्याकडून पुरवठा वेळेत मिळाला नव्हता. मात्र, आता औषधाची टंचाई दूर झाली असून पुरवठा सुरळीत सुरु आहे.”
– डॉ. अभय दादेवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी






