Social Media Rumors: पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली बेपत्ता? ‘त्या’ व्हायरल क्लिपचे सत्य अखेर आले समोर…जाणून घ्या
Social Media Rumors: सनसिटी परिसरातून मुलीचे अपहरण झाल्याच्या दाव्यासह १२३ मुली गायब असल्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल.

Social Media Rumors- पुण्यातील सनसिटी परिसरातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले, मदत मागण्याच्या बहाण्याने मुलीला पळवून नेले, तसेच गेल्या २२ दिवसांत पुणे शहरातून १२३ मुली गायब, राज्यातून तब्बल २३ हजार मुली बेपत्ता, अशा दाव्यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. या क्लिपची खातरजमा न करताच अनेकांकडून त्या पुन्हा तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. गेल्या दोन-चार दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध पोस्ट, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. यामध्ये एका महिलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित केलेली एक क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपचा संदर्भ देत इतरांकडूनही त्याच आशयाचे व्हिडिओ तयार करून विविध दावे केले आहेत.
विशेष म्हणजे या क्लिपमध्ये पुण्यातील सनसिटी परिसराचा उल्लेख असल्याने अनेक नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातही यासंदर्भात मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. सनसिटीमध्ये नेमके काय घडले?, मुलीचे अपहरण झाले आहे का, अशा विचारणा नागरिकांकडून होत आहेत. मात्र, समाजमाध्यमांवरील दाव्यांची सत्यता आणि नेमकी वस्तुस्थिती अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे केवळ व्हायरल क्लिपच्या आधारे निष्कर्ष काढणे अथवा ती पुढे प्रसारित न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
खात्री न करताच फॉरवर्ड
समाजमाध्यमांवरील संदेशांची सत्यता तपासण्याची तसदी न घेता अनेक नागरिक हे व्हिडिओ पुढे पाठवत आहेत. त्यामध्ये सुशिक्षित नागरिकांचाही समावेश आहे. एकाच क्लिपचा संदर्भ घेऊन त्यावर आधारित नवनवीन व्हिडिओ तयार होत असल्याने मूळ माहितीपेक्षा अफवाच अधिक वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा संवेदनशील विषय अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.
संबंधित महिलेची चौकशी
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या रील्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली. ऑडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून तिच्याशी चर्चा करण्यात आली आहे, तसेच संबंधित सोसायटीचे व्यवस्थापन, शेजारी आणि इतर संबंधित व्यक्तींकडूनही माहिती घेतली आहे. सद्यस्थितीत अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याचे तपासात समोर आले नाही.
– गौहर हसन, उपायुक्त, गुन्हे शाखा






