Pune FDA Action: पुण्यातील आस्थापना एफडीएच्या रडारवर! शहरातील ‘या’ प्रसिद्ध हॉटेल्स आणि डेअऱ्यांचे परवाने निलंबित
Pune FDA Action: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धडक मोहीम; १० आस्थापनांवर कारवाईचा बडगा.

Pune FDA Action- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची मागणी वाढली असताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून भेसळयुक्त व संशयित अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई केली. एकूण दहा आस्थापनांवर प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत श्रीखंड, स्वीट लस्सी, मँगो लस्सी, तूप, खवा, नमकीन, बदाम, मिठाई, चीज आदी अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
पुणे शहरातील महर्षीनगर येथील मोरबिवाला स्वीट्स अँड नमकीन येथून पापडी व पुरी नमकीन जप्त करण्यात आले. मार्केट यार्डातील लक्ष्मीनारायण ट्रेडिंग कंपनी येथून बदाम, पुरंदर तालुक्यातील एकहटपूर येथील पांडियन प्रॉडक्ट्स अँड सेलिंग येथून विविध मिठाई पदार्थ, वारजे येथील लक्षेश्वर डेअरी येथून तूप, तर उरुळी देवाची येथून चीजचा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्य आस्थापनांची तपासणीही करण्यात आली. अन्न सुरक्षा मानक कायद्याचे उल्लंघन, मोठ्या प्रमाणातील अस्वच्छता तसेच झुरळे-किटकांचा प्रादुर्भाव आढळलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. पुण्यातील साई प्रसाद व्हेज, मानस फॅमिली रेस्टो अँड लाउंज आणि शिवराज व्हेज रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली.
ग्रामीण भागात झालेली कारवाई
बारामती तालुक्यातील मगरवाडी, करंजे येथील नवनाथ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथून शिरकंडाचा साठा जप्त करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील निरा येथील अदिती मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथून स्वीट लस्सी व मँगो लस्सी, तर दौंड तालुक्यातील हाटवळण येथील ओशन मिल्क अँड फूड प्रॉडक्ट्स येथून तूप व खव्याचा साठा जप्त करण्यात आला. इंदापूर येथील विष्णू विठ्ठल जाधव मिल्क कुलिंग सेंटर, शिंदे कॅलट फिल्ड, जय श्रीराम मिल्क संकलन केंद्र १,
शिवकृपा दूध संकलन व शीतकरण, हेरिटेज फूड लि, (दूध संकलन केंद्र) जय श्रीराम मिल्क संकलन केंद्र २, बारामती मधील कानोबानाथ सहकारी दूध संकलन केंद्र, दौंडमधील मळगंगा मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रॉडक्टस्, श्री भोर मलनाथ दूध संकलन केंद्र, शिरूर येथील हॉटेल राजपूत आणि बारामतीतील जेके चायनीजवर कारवाई करण्यात आली.






