पणजी – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला. कॉंग्रेसने जनतेसाठी कार्य केले असते; तर माझ्यासारख्या व्यक्तीला राजकारणात येण्याची गरजच भासली नसती, असे केजरीवाल यांनी म्हटले.
कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी गुरूवारी केजरीवाल आणि आपवर टीकेची झोड उठवली. गोव्यात भाजपची पीछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे त्या पक्षाला मदत करण्याच्या उद्देशातून आप गोवा विधानसभा निवडणूक लढवत आहे. केजरीवाल भाजपच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची हुकूमशाही कार्यपद्धती, वर्तणूक पाहता ते छोटे मोदीच आहेत, असे सुर्जेवाला यांनी म्हटले.
त्या टीकेचा समाचार केजरीवाल यांनी घेतला. पक्षबदल न करण्याची हमी देणाऱ्या प्रतिज्ञापत्रांवर गोव्यातील आपच्या उमेदवारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच पाऊल कॉंग्रेसनेही उचलले. पक्षाच्या गोव्यातील उमेदवारांनी तशीच प्रतिज्ञापत्रे दिली. तसेच, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली.
त्याविषयीच्या प्रश्नावर केजरीवाल उत्तरले, आपच्या सर्व चांगल्या गोष्टींची कॉपी कॉंग्रेस करत असेल तर स्वागतच आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थान, छत्तिसगढमध्येही आमच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी. कॉंग्रेसने सर्व चांगल्या गोष्टी केल्यास मला पक्ष चालवावा लागणार नाही, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.