देहूगाव- देहू नगरपंचायत हद्दीमध्ये मासे, मांस विक्री करण्यास शुक्रवार ( दि.1) पासून बंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ही नगरपंचायतीने दिला आहे.
तीर्थक्षेत्र देहू हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी व योगभूमी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनार्थ देहूत येत असतात. ही संतभूमी असल्याने श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहूकर यांच्या मागणी अन्वये ग्रामपंचायत काळातही ग्रामसभेत ठराव घेऊन बंदी करण्यात आली होती मात्र पुन्हा हळूहळू मांस, मटन, मासेविक्रीचा व्यवसाय सुरू झाला. तो दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे.
त्यानुसार एक एप्रिलपासून परिसरात मांसविक्री करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. जर परिसरामध्ये कोणी लपून मांस विक्री करताना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. परिसरामध्ये तशी दवंडी देण्यात आली आहे.