Shivsrushti Landewadi: भोसरीतील ‘शिवसृष्टी’ धूळ अन् कचऱ्याच्या विळख्यात! ऐतिहासिक वारशाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
Shivsrushti Landewadi: भोसरीतील लांडेवाडी येथील ऐतिहासिक शिवसृष्टीची देखभालीअभावी दुरवस्था; झाडे-झुडपे आणि अस्वच्छतेमुळे शिल्पांची हानी.

Shivsrushti Landewadi – भोसरीतील लांडेवाडी परिसरातील ‘शिवसृष्टी’ सध्या देखभालीअभावी दुरवस्थेत सापडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि इतिहासातील विविध प्रसंगांचा परिचय करून देणारी ही शिवसृष्टी एकेकाळी नागरिकांचे आकर्षण ठरत होती. मात्र, सध्या धूळ, वाढलेली झाडे-झुडपे, अस्वच्छता आणि जीर्ण झालेल्या भागांमुळे या परिसराचे सौंदर्य हरपले आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लांडेवाडी परिसरातून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या शिवसृष्टीच्या भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग शिल्पांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. या शिल्पांमधून महाराजांचा इतिहास, शौर्य आणि तत्कालीन संस्कृतीची माहिती मिळते. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. मात्र, योग्य देखभालीअभावी शिल्पांभोवती झाडाझुडपे वाढली असून धूळ आणि अस्वच्छतेमुळे शिल्पांची स्पष्टता कमी होत आहे.
शिल्पांची झीज होण्याची भीती
पावसाळा, ऊन, धूळ आणि वाढलेल्या झाडाझुडपांचा परिणाम शिल्पांवर होत आहे. काही भाग तुटलेले किंवा जीर्ण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ वरवरची स्वच्छता न करता संपूर्ण शिवसृष्टीची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती व संवर्धनाची कामे करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी इतिहासाची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, परिसराची दुरवस्था कायम राहिल्यास विद्यार्थ्यांना आणि नव्या पिढीला या ठिकाणाचा अपेक्षित शैक्षणिक लाभ मिळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी उभारलेला ऐतिहासिक प्रकल्प केवळ उभारून न ठेवता त्याची नियमित देखभाल करणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेने तातडीने पाहणी करून परिसराची स्वच्छता, झाडाझुडपांची छाटणी, शिल्पांची स्वच्छता, तुटलेल्या भागांची दुरुस्ती आणि माहितीफलकांचे संवर्धन करावे. तसेच नियमित देखभाल, पुरेसा प्रकाश आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इतिहासाची साक्ष देणारी ही शिवसृष्टी पुन्हा वैभवात यावी आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारे ठिकाण म्हणून तिचे जतन व्हावे, अशी अपेक्षा भोसरीकर व्यक्त करत आहेत.






