Electricity Theft Case: स्मार्ट मीटरशी छेडछाड भोवली! महावितरणकडून भोसरीतील १९ वीजचोरांवर गुन्हे; १२ लाखांचा दंड
Electricity Theft Case: भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण उपविभागात स्मार्ट मीटरची पाहणी करताना सीटी बायपास व सील तोडण्याचे गैरप्रकार उघड.

Electricity Theft Case – स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वीजग्राहकांवर महावितरणने कठोर कारवाई सुरू केली आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरची तपासणी केली असता मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच ‘सीटी बायपास’ करून मीटरची गती कमी करण्याचा प्रयत्न केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
या १९ प्रकरणांपैकी ९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करून १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. तर उर्वरित १० प्रकरणांमध्येही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरला छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे.
स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्यात आली.चऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीजग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर प्रकार आढळून आला. तपासणीदरम्यान मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात २ लाख ६६ हजार ८०० रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.
महावितरणच्या कारवाईत दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यात संबंधित वीजग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सचिन भास्कर तायडे १,१८,३६० रुपये, सुरज संजीवकुमार सूर्यवंशी १,५३,७७० रुपये, दयानंद श्रीमंत रसाळ १,४६,७० रुपये, संदीप लक्ष्मण गवळी १,५६,५९० रुपये, विष्णू सखाराम चोपडे १,४०,४१० रुपये, भगवत नारायण इंगळे १,४६,६५० रुपये, आनंद जी. ६८,८६३ रुपये आणि ब्रिजेश बाळासो बुतुगडे ४३,६२२ रुपयांची, या सर्वांकडून दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.
वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकरणांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे. स्मार्ट मीटरला चकवा देऊन वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






