Dengue Cases: सावधान! डेंग्यू आणि मलेरियाचा शहरात उद्रेक; ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही आलेख चढताच
Dengue Cases: जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान २,३७५ संशयितांपैकी ६७ जण डेंग्यू बाधित; एकट्या सप्टेंबरच्या सुरुवातीलाच १५ रुग्णांची भर.

Dengue Cases – पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू आजाराने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या जानेवारी ते सप्टेंबर दरम्यानच्या आकडेवारीनुसार, शहरात २ हजार ३७५ डेंग्यू संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
जानेवारी ते मे दरम्यान डेंग्यूचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. जूनपासून रुग्णसंख्येत वाढ झाली. जूनमध्ये २५२ संशयितांपैकी २ जण बाधित, जुलैमध्ये ५८० पैकी १३ जण, तर ऑगस्टमध्ये तब्बल ९५७ संशयितांपैकी ३७ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत २८८ संशयितांपैकी १५ जण बाधित आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे.
मलेरियाचेही २० बाधित
डेंग्यूबरोबरच मलेरियानेही शहरात डोके वर काढले आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान तब्बल ३ लाख २० हजार ६१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जानेवारीत एक, मार्चमध्ये चार, एप्रिलमध्ये तीन, मेमध्ये पाच, जूनमध्ये एक, जुलैमध्ये दोन आणि ऑगस्टमध्ये चार जणांना मलेरियाची लागण झाल्याची नोंद आहे. सुदैवाने या दोन्ही आजारांमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.
चिकनगुनियावर नियंत्रण
चिकनगुनियाचे १२ संशयित रुग्ण आढळले असले तरी त्यापैकी एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे सध्या चिकनगुनियाची स्थिती नियंत्रणात असल्याचे आकडेवारीवरून दिसते. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थळे रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी व प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.
जून ते ऑगस्टदरम्यान २,२६१ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मात्र डेंग्यू आणि मलेरियाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यानंतरही डासजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर कायम आहे.





