Garbage Issue: कचरा डेपो सुरू झाला; पण रस्त्यावर घंटागाड्यांच्या रांगा! दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त
Garbage Issue: वाहने तासन्तास एकाच जागी उभी राहत असल्याने भोसरी, चिंचवड आणि सांगवी परिसरात तीव्र दुर्गंधी व वाहतूक कोंडी.

Garbage Issue – मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यानंतर शहरातील कचरा संकलनाला काही प्रमाणात गती मिळाली आहे. तरीदेखील स्थानांतरण केंद्रांवरील व्यवस्थेचा प्रश्न कायम असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. शहरातून कचरा संकलित करणारी घंटागाडी कचरा टाकण्यासाठी तासन्तास रस्त्यावर रांगेत उभी राहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.
८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून दुर्घटना घडली होती. त्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र, कचरा वाहतूक व्यवस्थेवर त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप जाणवत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भोसरीतील गवळी माथा, चिंचवडमधील डॉ. हेडगेवार पूल, भोसरीतील कै. ज्ञानबा मोझे महाविद्यालय परिसर आणि जुनी सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाटामागील भागात घंटागाड्यांच्या रांगा लागत असल्याची तक्रार आहे.
वाहने बराच वेळ एकाच ठिकाणी उभी राहत असल्याने कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कचरा वाहतूक आणि स्थानांतरण केंद्रांची व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.





