सातारा, (प्रतिनिधी) – प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनाबाबत जिल्हा व्यावसायिक शिक्षण विभाग आणि जनता सहकारी बँक यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे गेल्या 17 महिन्यांपासून विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी दोन तास धरणे आंदोलन केले
व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाकडून प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. या कार्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या 32 असून, त्यांचे विद्यावेतन गेल्या 17 महिन्यापासूनचे देण्यात आलेले नाही. ही रक्कम 17 ते 18 लाख रुपयांच्या घरात असल्याने विद्यार्थ्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांकडे गार्हाणे मांडले. याबद्दल सचिन मोहिते व युवा आघाडी जिल्हाप्रमुख माउली पिसाळ, जिल्हा उपप्रमुख सागर धोत्रे यांनी टाळा ठोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्राचार्य यू. व्ही. देशमाने यांना पदाधिकार्यांनी जाब विचारला. या प्रश्नी बँक व प्रशिक्षण विभाग कार्यालय यांच्यात टोलवाटोलवी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांचे विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोहिते यांनी दिला. या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यांवर लवकरच जमा करण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापनाच्यावतीने देण्यात आले.