Shirur News: शिरूरमध्ये हक्काच्या वेतनासाठी लढा! नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाची दखल
Shirur News: सामाजिक कार्यकर्ते महिबूब सय्यद यांचे चार दिवसांपासून उपोषण; कामगारांना न्याय मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार.

Shirur News – शिरूर नगरपरिषदेमध्ये ठेक्यावर कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन मिळत नसल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर हा प्रश्न आता राज्यस्तरावर पोहोचला आहे. किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते महिबूब सय्यद यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा लाभलेले गणेश ताठे यांनी गुरुवारी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.
महिबूब सय्यद हे चार दिवसांपासून उपोषण करीत असून, ठेक्यावरील सफाई कामगारांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, नगरपरिषदेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी व्हावी, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, आदी प्रमुख मागण्या त्यांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर ताठे यांनी कामगारांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या.
संबंधित कागदपत्रांची पाहणी करून त्यांनी कामगारांच्या वेतनाबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, शिरूर नगरपरिषदेतील ठेक्यावरील सफाई कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन दिले जात नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले असून, ही गंभीर बाब आहे. त्यांनी उपोषणस्थळावरूनच जिल्हा कामगार आयुक्त अभय गीते तसेच शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
ठेक्यावरील सर्व सफाई कामगारांना शासनाच्या नियमांनुसार किमान वेतन लागू करावे, त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. राज्य शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून थेट हस्तक्षेप झाल्याने या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्यक्ष आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.





