PCMC protest: मोशी दुर्घटनेप्रकरणी आमदार महेश लांडगे निशाण्यावर; महापालिकेत कचरा फेकत आंदोलन
PCMC protest: पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधकांचे आंदोलन; पर्यावरण प्रमुख संजय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची मागणी.

PCMC protest – मोशी दुर्घटनेचे तीव्र पडसाद महापालिकेत बुधवारी (दि. १५) उमटले. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विविध पक्ष व संघटनानी आंदोलने केली. या संपूर्ण आंदोलनाचा मुख्य रोख सत्ताधारी भाजप आणि भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर होता. कचऱ्यातून चोरी करणाऱ्या आमदाराचा धिक्कार असो आणि महेश लांडगे मुर्दाबाद अशा घोषणांनी संपूर्ण महापालिका परिसर हादरून गेला होता.
मोशी दुर्घटनेच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालय आणि सभागृहात विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांनी विविध पद्धतीने आंदोलन करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यामुळे महापालिका वर्तुळातील राजकीय वातावरण तापले होते. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेवकांनी थेट कचऱ्याचा ढीग आणून त्यावर पालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांचा फोटो लावला.
इतकेच नव्हे तर या फोटोला नोटांचा हार घालून कुलकर्णी यांच्या कथित भ्रष्टाचाराचा आणि निष्काळजीपणाचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी महापालिका सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आंदोलकांनी प्रवेशद्वार अडवून धरत जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात ठाकरे गटाचे शहरप्रमुख चेतन पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, रोमी संधू यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांनी आयुक्त विजय सूर्यवंशी आणि पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप करत घोषणाबाजी केली.
संजय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कुलकर्णी यांना अटक झालीच पाहिजे, कचऱ्यातून चोरी करणाऱ्या आमदाराचा धिक्कार असो…., आमदार महेश लांडगे मुर्दाबाद….अशा घोषणांनी परिसर गाजला. मोशी कचरा डेपोतील अपघाताला पूर्णपणे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप या वेळी नेत्यांनी केला. या आंदोलनामुळे महापालिकेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.
निषेधात्मक ॲप्रन घालून सभागृहात घोषणाबाजी
या आंदोलनाची धग केवळ बाहेरच नाही, तर पालिका सभागृहाच्या आतही पाहायला मिळाली. सभा सुरू होताच शिंदे गटाचे गटनेते विश्वजित बारणे, नगरसेविका सुलभा उबाले, निलेश बारणे, निलेश तरस आणि ऐश्वर्या तरस यांनी निषेधात्मक ॲप्रन परिधान करून सभागृहात प्रवेश केला. प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करत या नगरसेवकांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आणि आपला तीव्र विरोध नोंदवला.






