Shashank Ketkar: “निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आला”… शशांक केतकरने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

Shashank Ketkar : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका पोस्टद्वारे त्याने निर्मात्याकडून मानधन न मिळाल्यामुळे आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. शशांकने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, अनेक वर्षांपासून त्याचे पैसे अडकले असून आता संयम सुटण्याची वेळ आली आहे.
शशांक केतकर सध्या ‘मुरंबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेला शशांक अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांबद्दल उघडपणे बोलताना दिसतो. याच पार्श्वभूमीवर त्याने ही संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये शशांक काय म्हणाला?
शशांकने लिहिले की, “गेली पाच वर्षे झाली आहेत. ८ ऑक्टोबरपासून पुन्हा संपर्क सुरू झाला, पण एकही दिलेली तारीख निर्मात्याने पाळलेली नाही. आता पुन्हा एक नवी तारीख दिली आहे. इतक्या निगरगट्ट आणि कोडग्या निर्मात्याच्या थापांचा खरंच कंटाळा आलाय.”
पुढे तो म्हणतो, “आता त्याने ५ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख दिली आहे. जर त्या दिवशी पूर्ण पेमेंट मिळालं नाही, तर मी सविस्तर व्हिडिओ पोस्ट करणार आहे सगळ्या पुराव्यांसह. आणि जर पेमेंट झालं, तर ते झाल्याचाही व्हिडिओ टाकेन.”
निर्मात्याचं नाव गुप्तच
या पोस्टमध्ये शशांकने संबंधित निर्मात्याचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे, याबाबत चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अनेकजण अंदाज बांधताना दिसत आहेत.
अभिनयाची भक्कम ओळख
शशांक केतकरने ‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात ओळख मिळवली. त्यानंतर त्याने चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच त्याचा ‘कैरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सध्या तो ‘मुरंबा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
आता शशांकने जाहीर केलेल्या ५ जानेवारी २०२६ या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून, पुढे तो कोणता खुलासा करणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.





