“आमचे जीव घेण्याचा अधिकार…”; अभिनेता शशांक केतकरने घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन व्यक्त केला संताप

Shashank Ketkar| अभिनेता शशांक केतकरने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असल्याचे दिसते. अनेक सामाजिक विषयांवर तो परखडपणे आपले मत व्यक्त करताना दिसतो. नुकत्याच घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर शशांक एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
शशांकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हंटले की, “काल मुंबईतील वादळामुळे १२० फूट १२० फूट मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले. दुर्दैवाने त्यावेळी पाऊस पडत असल्याने काही जणांनी पेट्रोल पंपाखाली आसरा घेतला होता. मात्र हा बोर्ड त्यांच्या अंगावर पडला आणि जे घडू नये ते घडलं. आजचा मृतांचा आकडा १४ आहे. मुळात फक्त ४० बाय ४० फूट बोर्ड लावण्याची परवानगी असताना हा बोर्ड उभा राहिलाच कसा? एखाद्या फ्लायओवरवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, हे असं कसं असू शकतं. म्हणजे एखादा अपघात झाला तर तुम्ही तो कव्हर कसा करणार? कोण चूक, कोण बरोबर? हे कसं ठरवलं जाणार? “, असा सवालही त्याने केला.
पुढे शशांक म्हणाला, “मी ठाण्यात राहतो. मी रोज मढहून घोडबंदरला जातो. त्या घोडबंदर रोडला चौपाटी तयार होते. हे चांगले नाही. रस्त्यावरील वाहने वाढली आहेत, लोकसंख्या वाढली आहे. मग रस्ते वाढवण्याचे काम पटापट व्हायला नको का? ही जबाबादारी कुणाची? कुणाचं सरकार, कुठली महानगरपालिका याच्याशी मला घेणदेण नाही. ही सत्तेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. यावर मला कुठल्याच राजकीय पक्षाला किवा राज्यकर्त्याला काहीच म्हणायचं नाही.”
“ही एक नैसर्गिक आपत्ती होती. यात कोणाचाही सहभाग नव्हता. आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की आपल्या जगण्याची, जीवाची फार किंमतच नाही. हे पुन्हा पुन्हा दिसून येतंय. गेल्या काही वर्षात देशात खूप चांगली प्रगती होत आहे, वेगवेगळ्या लेव्हलवर आपण प्रगती करत आहोत, याचं कौतुकच आहे. परंतु अनेक गोष्टी सुधारणं खूप गरजेचे आहे.”
… तर किती लहान मुलांचा जीव गेला असता Shashank Ketkar|
या व्हिडिओत शंशाकने शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबाबत देखील सवाल उपस्थित केला आहे. शंशाक म्हणाला की, ‘मी एका मुलाचा बाप आहे. नशीबाने शाळा सुरु नाहीत. जर शालेय मुलांची बस त्या पेट्रोल पंपाखाली उभी असती आणि तो बोर्ड पडला असता तर किती लहान मुलांचा जीव गेला असता. याला काहीच अर्थ नाही. तुमच्या डोक्यात काही शिरतंय का? मी यामागे देखील व्हिडिओ टाकला होता. ज्यामुळे माझ्या कारचे टायर्स बर्स्ट झाले होते. त्या रस्त्यावर सळई बाहेर निघाल्या होत्या. ती सळई माझ्या चाकात घुसली. कारचं चाक फाटले. आता याचे पैसे कोण देणारे? जर एखादा राजकीय नेत मुलगा बाईकवरुन जात असेल त्याच्या डोक्यावरुन गाडी गेली तर कसं वाटेल? राजकारणी लोकांना लाज कशी वाटतं नाही? मी सुजाण नागरिक आहे. मी वोटिंगही केले. पण, प्लीज हे अनधिकृत बोर्डिंग आणि फ्लेक्स काढून टाका.” अशी विनंती देखील यावेळी शशांकने केली.
राजकीय नेत्यांवर निशाणा
“फ्लेक्सवरील मोठेमोठे फोटो आणि त्याखाली कार्यकर्त्यांचे लहान फोटो बघण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. लोकांचे जीव जातात. त्याकडे लक्ष द्या. यावर्षी सरकारमध्ये कोण येईल त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही. तुमच्या इगोसाठी आमचे जीव घेऊ नका? होर्डिंग पडल्यामुळे ज्या लोकांचा जीव गेला त्यांचा काय दोष होता? आमचे जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. देश जागतिक पातळीवर नाव कमावतोय. परंतु या मुलभूत गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज नाही का?” असा सवाल त्याने राजकीय नेत्यांना विचारला आहे. Shashank Ketkar|
“देशात फक्त गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हे सगळं थांबवुया. आता नागरिक म्हणून आपण देश सुधारवायला हवा. दुर्देवाने आपल्या घरातील कोणी मरत नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत त्याची झळ पोहचत नाही. आपण तेवढ्यापुरतं वाईट झालं म्हणतो, आणि आपल्या कामाला लागतो. मी फक्त नागरिक म्हणून हे सगळं सांगत आहे. तो मालक मिळालाच पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. या अनधिकृत गोष्टी बंद झाल्या पाहिजेत,” असे शशांकने म्हंटले आहे.
हेही वाचा:
अनुषा दांडेकरची अभिनेता भूषण प्रधान यांची खास पोस्ट; म्हणाली “माझं तुझ्यावर खूप प्रेम”





