‘गुनाह’चा दुसरा सीझन आला, पण पहिल्या सीझनच्या कामाचेच पैसे भेटले नाहीत, शशांक केतकरने व्यक्त केला संताप

Shashank Ketkar Post: अभिनेता शशांक केतकर ‘मुरांबा’, ‘होणार सून मी ह्या घरची’ सारख्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. शशांकने हिंदी वेब सीरिज ‘गुनाह’मध्ये देखील भूमिका साकारली आहे. या सीरिजचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. मात्र, शशांकने पहिल्या सीझनमध्ये केलेल्या कामाचे अद्याप पैसेच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत शशांकने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
‘गुनाह’ या हिंदी वेब सीरिजचा पहिला सीझन 3 जून 2024 ला रिलीज झाला होता. या सीझनमध्ये शशांकसह गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती, झयान खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये देखील शशांकने भूमिका साकारली आहे. परंतु, पहिल्या सीझनमध्ये त्याने केलेल्या कामाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.
याबाबत माहिती देताना शशांकने सोशल मीडियावर सांगितले की, गुनाह सीझन 2 आज पासून सुरू पण…सीझन दोनचं शूटिंग संपलं होतं तरी सीझन 1 चे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते.
सीझन 1 चे पैसे मिळाल्याशिवाय सीझन 2 चे मी डबिंग करणार नाही अशी कंडिशन घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करून घेतली आहेत, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कामाचे पैसे न मिळाल्याची तक्रार करतानाच त्यांनी वेब सीरिजच्या निर्मात्यांना देखील पोस्टमध्ये टॅग केले आहे. दरम्यान, गुनाह वेब सीरिजचा नवीन सीझन 3 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनमध्ये गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती, झयान खान हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसतील.





