School Holiday : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! निवडणुकीच्या कामामुळे शाळांना मिळणार सलग 4 दिवस सुट्टी?

Maharashtra Assembly Election 2024 । School : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, सर्वच राजकीय नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अश्यातच शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना सलग 4 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अनेक शिक्षक निवडणूक कर्तव्यावर असल्याने अनेक शाळांना बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याबाबत शाळांना सूचना पाठवल्या आहेत. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना घ्यायचा आहे.
त्यामुळे या तीन दिवसांच्या सुट्टीचा शालेय विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. रविवारही यात समाविष्ट असल्याने विद्यार्थ्यांना एकूण चार दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे. निवडणुकीच्या कामासाठी शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षकांच्या कामांमुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा. याबाबतचे आवश्यक आदेश जाहीर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
शिक्षण आयुक्तांनी विनंती पत्रात नेमकं काय म्हटलं…
“उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर, 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल,
त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती”, असं शिक्षण आयुक्तांनी पत्रात म्हटलं आहे.





