Maharashtra Drought : आणखी १८ तालुक्यांत दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी होणार
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने आणखी 18 तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास मान्यता दिली आहे.

Maharashtra Drought – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने आणखी 18 तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास मान्यता दिली आहे.
या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करण्यात येणार असून, उपग्रह छायाचित्रे व संगणकीय माहितीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीशी पडताळणी केली जाणार आहे. यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचे वास्तव चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
खरीप हंगाम 2026 मधील परिस्थितीच्या आधारे 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांत ट्रिगर-1 निकषांनुसार दुष्काळ जाहीर करून विविध 12 उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या 29 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांचा विचार करून आणखी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
या 18 तालुक्यांमध्ये होणार पाहणी
मुदखेड, मुखेड (नांदेड), जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर (चंद्रपूर), आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया (गोंदिया), कारंजा (वर्धा), मोहाडी, तुमसर (भंडारा), त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड (नाशिक), पाटण (सातारा), शिराळा, वाळवा (सांगली).





