सातारा -जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. तिसरी लाट बालकांची येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बालकांच्या आरोग्याची काळजी घेऊन तिसऱ्या लाटेचा धोका टाळूया, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयाच्या संकल्पनेतून क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात निर्माण झालेल्या व सिप्ला फौंडेशन मुंबई, सेव्ह द चिल्ड्रेन, पुण्याचे टेक महिंद्रा फौंडेशन यांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून तसेच सीवायडीए , मीनाक्षी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभ्या केलेल्या 15 बेडच्या बाल कोविड अतिदक्षता विभागाच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने, जिल्हाधिकारी शेखर सिंह, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारी यंत्रणेबरोबरच समाजकार्य महाविद्यालय आणि सर्व कंपन्याऩा प्रोत्साहन दिले.
जकातवाडी येथे सुरु करावयाच्या कोविड केअर सेंटरसाठी प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन प्रास्ताविकामध्ये लक्ष्मण माने यांनी केले. विविध कंपन्यांनी आजपर्यंत महाविद्यालयाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांची मदत जिल्ह्यातील कोविडग्रस्त तसेच आपत्तीग्रस्तांना केल्याची माहिती त्यांनी दिली.
संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल व त्यांवर करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी तसेच करोना काळात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुंबईच्या सिप्ला फौंडेशन, पुण्यातील सीवायडीए, सेव्ह द चिल्ड्रेन फौंडेशन महाराष्ट्र, टेक महिंद्रा फौंडेशन, समाजकार्य महाविद्यालयांचे पदाधिकारी, मीनाक्षी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रतापराव गोळे व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
प्रा. भाई शैलेंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभले. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. जीवन बोराटे, काजल गायकवाड, विद्यार्थी व जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राम जाधव, वैद्यकीय अधिष्ठाता संजय गायकवाड, हेमंत भोसले यांनी नियोजन केले. प्राचार्या डॉ. शाली जोसेफ यांनी आभार मानले.