महिला वर्गात उत्साहाचे वातावरण
कराड (प्रतिनिधी) – आपल्या लाडक्या गणपती प्रतिष्ठापणेनंतर वेध लागते ते गौराईचे. आज रविवारी सोनपावलांनी तालुक्यात गौराईंचे थाटात आगमन झाले. घागर घुमू दे, घुमू दे. रामा पावा वाजु दे…, आली गवर आली, सोनपावली आली…अशा गाण्यांनी प्रफुल्लित झालेल्या वातावरणात महीला वर्गानी आपल्या लाडक्या गौराईची प्राण प्रतिष्ठापणा केली. सुहासिनींनी एकत्र येत गौराईला सजवले.
शुक्रवारी बुद्धीचा देवता गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महिला वर्गाचे लक्ष लागून राहिलेल्या गौराईचे रविवारी आगमन झाल्याने महिला वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गेली दोन दिवसांपासून बाजारपेठेत महिलांनी मोठी गर्दी केली होती.
गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला गौरीचे नाविण्यपूर्व मुखवटे महिलांना आकर्षित करत होते. या मुखवट्यांसह बाजारातून गौरीसाठी लागणाऱ्या दागिने, फळे, फुलांसह आवश्यक वस्तूंची खरेदी केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच गौरी बसवण्याचे वेध महिलांना लागले होते. त्यामुळे या महिलांची दिवसभर लगबग दिसून आली. दुपार नंतर गौरी आगमनासाठी ठिकाणी महिलांनी गर्दी केली होती. येथील प्रीतीसंगमावरील कृष्णा नदीवरुन गौरीचे मुखवटे व फुलोराचे पूजन करून त्यांची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली.
गौरीच्या नैवेद्यासाठी शेपूची भाजी व भाकरी या नैवेद्याचा मान असतो. गौराईची प्रतिष्ठापना झाल्यावर गुरुवारी गौरी समोर वेगवेगळे खाद्यपदार्थ मांडण्यात येतात. तसेच त्या रात्री गौरी जागवण्याचा कार्यक्रम होत असतो. यावेळी महिला वर्गाकडून विविध गौरीची गाणे गायली जातात गौराईच्य आगमनाने उत्सवाचाआनंद आणखी द्विगुणित झाला आहे.