Satara News: शिवेंद्रसिंहराजेंची बदनामी भोवणार? ‘आम्ही सातारकर’ संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Satara News: एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शिवेंद्रसिंहराजेंची बदनामी करण्याचा माथेफिरूंचा प्रयत्न; शिवछत्रपतींच्या घराण्याची प्रतिष्ठा मलिन करणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

Satara News – शहरात झालेल्या दहीहंडी कार्यक्रमानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे एआय तंत्रज्ञान, डिजिटल एडिटिंगच्या साहाय्याने मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही माथेफिरूंनी केला आहे. संशयितांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ‘आम्ही सातारकर’ संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल काटकर, सातारा शहरप्रमुख अमर बेंद्रे, मार्गदर्शक अमर मोकाशी, संस्थापक मनोहर भातुसे, अध्यक्ष अमर शेलार, सचिव मनोज पुजारी, भूषण पवार, मंगेश काशीद, सनी भिसे, अविनाश पवार, गणेश कुडवे, सुमित भोसले, शुभम निकम, क्षितिज बेंद्रे, अमर काटकर, गणेश काटकर यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन दिले.
या निवेदनत म्हटले आहे की, ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आणि मजकूर व्हायरल करणार्या सर्व सोशल मीडिया हँडलर्सवर गुन्हे दाखल करुन, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा घटनांमुळे छत्रपती घराण्याची आणि त्यांच्या वारसांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल राज्यातील प्रत्येकाला आदर आहे. मात्र, काही छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांवर आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी. संशयितांना येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.





