Protest for Wedding : लग्नासाठी 1 लाख रुपये द्या; सरकारी विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा! सोलापुरात ‘भावी नवरदेवा’चे अनोखे आंदोलन
Protest for Wedding : सोलापूर जिल्हा परिषदेसमोर मोहोळच्या युवकाचे अनोखे आंदोलन. लग्नासाठी 1 लाख रुपये अनुदान आणि सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करण्याची सरकारकडे मागणी.

Protest for Wedding : ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांच्या लग्नाचा प्रश्न आता सामाजिक विषय बनत असल्याची चर्चा आहे. अनेक गावांमध्ये वयाची पस्तीशी ओलांडूनही लग्न होत नसल्याने तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. मुली आणि त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, मुलींची घटलेली संख्या तसेच नवरदेव सरकारी नोकरीत असावा, ही अपेक्षा यामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते. (Protest for Wedding)
मुलगी नको, मुलगा हवा, वंशाला दिवा हवा, या मानसिकतेतून गेल्या काही वर्षांत मुलींच्या गर्भपाताच्या घटना घडल्या. त्याचा परिणाम आता लग्नाच्या वयातील पिढीतील मुलींच्या संख्येवर होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मुलींचे वाढते शिक्षण आणि नोकरी यामुळे अपेक्षाही वाढल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अनेक युवक बेरोजगार असून काही जण छोटे-मोठे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांच्या लग्नात अडचणी येत असल्याचे दिसते. (Protest for Wedding)
जिल्हा परिषदेसमोर अनोखे आंदोलन (Protest for Wedding)
या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील एका युवकाने सरकारनेच लग्नाच्या प्रश्नात लक्ष घालावे, या मागणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. कुरुल येथील रहिवासी किसनदेव ननवरे हे आंदोलनाला बसले आहेत. डोक्यावर मुंडावळ्या आणि नवरदेवाचा फेटा बांधून त्यांनी जिल्हा परिषदेसमोरील भिंतीवर डिजिटल फलक लावला आहे.
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यभर ऑफलाइन आणि ऑनलाइन सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच राज्यातील युवकांना लग्नासाठी सरकारने एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या अनोख्या आंदोलनाची सोलापूरमध्ये चर्चा सुरू झाली आहे.





