Purushottam Karandak : ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची कोल्हापूर विभागीय फेरी ३० ऑक्टोबरपासून
Purushottam Karandak : पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची कोल्हापूर विभागीय फेरी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान टेंबे रंगमंदिरात होणार. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

Purushottam Karandak : महाराष्ट्रातील महाविद्यालयीन नाट्यविश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६ ची कोल्हापूर विभागीय फेरी 30ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील एकांकिकांचे सादरीकरण टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे होणार आहे. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपली अभिनयक्षमता, दिग्दर्शन, लेखन आणि नाट्यकौशल्य सादर करणार आहेत.
30 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे आर्किटेक्चर महाविद्यालय ‘नकाब’, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर ‘शाब्बास पठठे !’, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड ‘छप्पर’ आणि राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय ‘ओऍसिस ’ या एकांकिका सादर करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता श्री. व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी ‘The Unseen Vision’, अशोकराव माने पॉलिटेक्निक, वाठार तर्फ वडगाव ‘वाघ आला वाघ’, शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र विभाग ‘मागचं दार’, भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर-२ ‘साठी’ आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ‘आभास’ या एकांकिका सादर करणार आहेत.
31 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर-१ ‘महाकुंभ’, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर ‘साडे तीन हातांचा हिशोब’, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली ‘विवर’ आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर ‘पालखी’ या एकांकिका सादर करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर ‘म्याडम’, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी ‘मोठा पाऊस आला आणि..’, डी. के. टी. ई. टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ आणि विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर ‘चौदा इंचाचा वनवास’ या एकांकिका सादर करणार आहेत.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता के. आय. टी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च ‘सहेला’, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (DOT), कोल्हापूर ‘Before the Trigger’ आणि आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागावणे ‘पेरा’ या एकांकिका सादर करणार आहेत.
या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची, नाट्यकलेतील कौशल्य विकसित करण्याची आणि राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूरमधील नाट्यरसिकांनी या एकांकिका स्पर्धेला उपस्थित राहून सहभागी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.





