Satara News: आदर्श शाळा आणि स्मार्ट आरोग्य केंद्रांसाठी ३२४ कोटी; पालकमंत्री शंभूराज देसाईंचा मोठा निर्णय
Satara News: प्राथमिक शिक्षण व आरोग्य यंत्रणा राज्यात अव्वल करण्यासाठी 'माझी शाळा, आदर्श शाळा' आणि 'स्मार्ट आरोग्य केंद्र' कामांना गती देण्याचे आदेश.

Satara News – प्राथमिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानी नेण्यासाठी ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ योजनांची कामे उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून डिसेंबरअखेर पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत देसाई यांनी दोन्ही योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, सर्व गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 84 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात 25 केंद्रांचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी 114 कोटी रुपये मंजूर आहेत. 209 प्राथमिक शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात या कामांपैकी 90 टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पूर्ण झालेल्या आदर्श शाळांना गटशिक्षणाधिकार्यांनी पंधरा दिवसांत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषद हद्दीत दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान एक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करावी, अशा सूचनाही ना. देसाई यांनी दिल्या. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय अधिकार्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्रपणे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे याशनी नागराजन यांनी सांगितले.
रुपनवर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना देसाई यांनी दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. चौकशी अहवाल गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसल्याचेही ना. देसाई यांनी स्पष्ट केले.




