Phaltan: डॉ. रुपनवर आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन
Phaltan फलटण उपजिल्हा रुग्णालयातील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून यापूर्वी महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनीही अशाच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

Phaltan: येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी नातेवाइक आणि ग्रामस्थांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर आणि रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
या संवेदनशील घटनेमुळे फलटण शहर आणि डॉ. रुपनवर यांचे मूळ गाव फडतरी (मांडवे) असलेल्या माळशिरस तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शस्त्र परवान्यासाठी नियमबाह्य फिटनेस प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळे एका माजी मंत्र्यांच्या ओएसडी/पीएने (प्रसाद कोंडे-देशमुख) डॉ. रुपनवर यांना धमकावले व वरिष्ठांनीही त्यांनाच मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. तक्रार करूनही संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने डॉ. रुपनवर यांचेच वेतन रोखले आणि अंतर्गत चौकशी लावून छळ केला. या त्रासाला कंटाळून डॉ. रुपनवर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाजवळील हाय- टेंशन टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान काल दि. ३१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून यापूर्वी महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनीही अशाच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिक अनावर झाला आहे.
डॉ. भगवान पवार (आरोग्य उपसंचालक), प्रसाद कोंडे-देशमुख आणि डॉ. लीला मदने यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि थेट उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करु, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. ‘मार्ड’ संघटनेनेही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांच्या होणाऱ्या मानसिक छळाविरोधात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





